तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता..


तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता..

ईश्वरभेटीसाठी आकांत मांडणार्‍या आंतरिक संघर्षाला तोंड देत ‘तुकोबा ते विठोबा’ हा खडतर प्रवास संपला. जे हवं होतं ते मिळालं. जिथं पोचायचं होतं तिथं पोचता आलं… घट बनवण्यासाठी कुंभार चाकाला गती देतो. हळूहळू आकार घेत घट तयार होतो. पूर्ण झाल्यावर घट चाकावरून काढून घेतला तरी गती दिलेलं चाक फिरतच राहातं. तसं ईश्वरभेटीचं इप्सित साध्य झालं तरी देह आहे तोपर्यंत जगणं उरतंच. पण ते केवळ उपकारापुरतं..! या कृतकृत्य भावनेची नोंद असलेला तुकोबांचा एक महत्त्वाचा अभंग सर्वश्रुत आहे. तो असा-
‘अणुरणीया थोकडा तुका आकाशाएवढा । गिळुनी सांडिले कलिवर । भव, भ्रमाचा आकार । सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी । तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता ॥ (९९३)
‘गिळुनी सांडिले कलिवर । भव, भ्रमाचा आकार’ या सहा शब्दात व्दैताकडून अव्दैताकडे झालेला प्रवास सांगितला आहे. ज्ञानप्राप्तीसाठी शरीर धारण करावे लागते. त्याचे भोग भोगावे लागतात. ज्ञानप्राप्ती झाल्यावर उमगते की हा देह, हा संसार अनित्य आहे. दिसतात ते सर्व केवळ भ्रमाचे आकार आहेत. हे आतून समजले की शरीर म्हणजे मी ही धारणा सोडणे शक्य होते. देहभावात असणे हे व्दैत आणि देहभावातून मुक्त होणे हे अव्दैत..! हे ज्ञान झाले. इतके खोलवर की ज्ञेय–ज्ञाता–ज्ञान ही त्रिपुटीही उरली नाही. त्यांचं वेगवेगळेपण निमालं. देहाच्या घटात आत्मज्ञानाचा दीप उजळला. तुकोबांच्या ‘अणुरेणूहूनही’ छोट्या ‘मी’ला आकाशाएवढं विस्तारलेलं स्व-रूप दिसलं..! आता देह इथं वावरला तरी तो केवळ जगण्याचा उपचार म्हणून. या अवस्थेला ‘उरलो उपकारापुरता’ म्हणणारा हा काव्यात्म अभंग विलक्षण सौंदर्यानुभूती देणारा आहे…!
(२००६ साली करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर येथे वि. स. खांडेकर स्मृती व्याख्यानमालेत केलेल्या भाषणासाठी मी ‘कवितेतील ईश्वर’ हा विषय घेतला होता. अनेक कवितांची उदाहरणं देत कविता हे ईश्वरशोधाचं समर्थ माध्यम कसं होऊ शकतं त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न मी केला होता. या भाषणाच्या शेवटी संत तुकाराम महाराजांनी आपल्या ‘कविते’तून हा शोध कसा घेतला ते विस्ताराने मांडले होते. गेले काही आठवडे त्यातलेच अभंग अधिक स्पष्टीकरणासह इथं शेअर केले. ते भाषण लेख स्वरूपात ‘कवितेभोवतीचं अवकाश’ या माझ्या लेखसंग्रहात समाविष्ट केलेले आहे.)