WhatsApp Shares: Senapati Bapat – Marathi article

सेनापती बापट व दादर….

गिरणगाव ही एकेकाळी मुंबईची वेगळी ओळख होती, इथले लोक, चाळ संस्कृती कशी दिमाखाने आपली एक परंपरा टिकवून होती. हे गिरणगाव आता नामशेष झालंय. आता इथे उच्चभ्रू, हाय प्रोफाईल लोकांसाठी टॉवर उभे राहिलेत. स्टेटस सिम्बॉल जपणाऱ्यांची नवी संस्कृती इथे वाढू लागलीय. इतकी की परेलच्या सेनापती बापट मार्गाचा एक मैलाचा तुकडा तोडून त्याचे नामकरण आता अमेरिकन स्टईलमध्ये *’गोल्डन माईल’ असे करण्याचा एका बिल्डरचा प्रयत्न सुरू आहे. आजच्या पिढीला मुळशीचा लढा आणि त्याचा हा सेनापती ठाऊकही नसेल, म्हणूनच सेनापती बापट यांच्याबाबतचा हा लेख आज शेअर करत आहे. हा लेख वाचल्यावर कदाचित या महापुरूषाचे कार्य कळेल. त्यांची आठवण सांगणाऱ्या मार्गाचे नामकरण करणे तुम्हाला योग्य वाटते का? तुमचं तुम्हीच ठरवा आणि रक्त खवळलं नसेल तर शांत बसा….
द्वारकानाथ संझगिरी

पिस्तूल ते झाडू

सध्या एका धक्कादायक वास्तवाकडे मी वळतोय. दादरमधल्या मंडळींना आपल्याच विभागात राहिलेले महापुरुष ठाऊक नाहीत. विशेषतः नव्या पिढीला.

परवाचीच एक गोष्ट सांगतोय.

दादर स्टेशनच्या जवळ एका दुकानात काहीतरी घेत होतो. इतक्यात एक संवाद कानावर पडला. एक ‘क्ष’ व्यक्ती ‘य’ व्यक्तीला चैत्यभूमीकडे जायचा रस्ता विचारत होती. ती ‘य’ व्यक्ती त्या ‘क्ष’ व्यक्तीला सांगत होती, ‘इथून सरळ जायचं. मग गोखले रोड लागेल. पुन्हा सरळ जायचं. मग एक सर्कल लागेल. तिथे पाच रस्ते फुटतात. त्या सर्कलमध्ये एका म्हाताऱ्या माणसाचा पुतळा आहे. तो पुतळा, क्रिकेटमध्ये पंचाने फलंदाजाला बाद दिल्यावर बोट कसं वर करतो तसा वर बोट करून उभा आहे. त्या बोटाच्या दिशेने गेलं की चैत्यभूमी येते.

’मी त्या ‘य’ व्यक्तीला म्हटलं, ‘आपण दादरचे?
’‘हो’, तो म्हणाला.
‘शाळा कुठली?’ मी विचारलं.
त्याने सांगितलं.
शाळा माझी नव्हती म्हणून मी सुटकेचा निःश्वास सोडला.
मी त्याला म्हटलं, ‘त्या पुतळ्यातल्या व्यक्तीचं नाव सेनापती बापट. एका सेनापतीला तुम्ही तो म्हातारा केलात.
’‘बरोबर बोललात.’ तो माझं म्हणणं फारसं मनावर न घेता म्हणाला, ‘बापट की फाटक असा माझा गोंधळ होत होता. तुमचं जनरल नॉलेज चांगलं दिसतंय.
’मला त्याच्या निगरगट्टपणाचं कौतुक वाटायला लागलं. मी त्याला आधी या रानडे रोडचे, रानडे कोण हे ठाऊक आहेत का विचारायच्या मूडमध्ये होतो. पण मी नाही विचारलं. कारण ‘ते माझ्या आईचे मामा होते’ असं त्याने निर्लज्जपणे सांगितलं असतं तर…

सेनापती बापट दादरच्या एका तरुण मुलाला ठाऊक नसणं हे दादरच्या शैक्षणिक गर्वाचे तुकडे आहेत. तुमच्या मनात जर आदरभाव नसेल तर पाठ्यपुस्तकांतून मिळणारं ज्ञान हे अळवावरच्या पाण्यासारखं असतं. कधी निघून जातं कळत नाही. आम्ही दादरकर एवढे नशीबवान आहोत की, एक त्यागी महापुरुष आमच्यात वास्तव्य करून गेला.

किती गोष्टी सेनापतींच्या सांगू? ते दोनदा मॅट्रिक पास झाले. पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून बसले तेव्हा संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवली. त्यांची बुद्धिमत्ता त्यांना आयसीएसकडे सहज घेऊन गेली असती; पण त्यांनी क्रांतिकार्यात उडी घेतली. मग स्वातंत्र्य चळवळीत विद्यार्थी रूप घेतलं म्हणून मॅट्रिकला बसावं लागलं तेव्हा पहिले आले. नंतर स्वा. सावरकरांच्या क्रांतिकार्यात उडी घेतली. त्यांनी सावरकरांना गुरू मानलं. ते सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेचे महत्त्वाचे घटक होते. सावरकरांनी त्यांना सांगितलं, ‘रशियाला जाऊन बॉम्बची विद्या शिकून ये.’ गुरूची आज्ञा त्यांनी शिरसावंद्य मानली आणि ते रशियाला निघून गेले. बॉम्ब विद्या शिकल्यावर त्यांनी सावरकरांना सांगितलं. ‘‘मला फक्त परवानगी द्या. मी ब्रिटिश पार्लमेंट उडवून येतो.’’ सावरकरांनी त्यांना कसंबसं रोखलं.

माणूस कापरासारखा ज्वालाग्राही. कधीही पेट घेऊ शकेल असा. मधल्या काळात बरीच उलथापालथ झाली. सावरकरांना अंदमानात जावं लागलं. बापटांनी हिंदुस्थानात येऊन मुळशीच्या सत्याग्रहात उडी घेतली आणि पांडुरंग बापट कायमचे सेनापती बापट झाले. मुळशीचा सत्याग्रह हा मुळशी धरणाच्या बांधकामामुळे ज्यांच्या जमिनी जात होत्या, त्या जमीनधारकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्याचा लढा होता. ह्या लढ्याच्या वेळी त्यांनी हिंसक अस्त्र फेकून दिलं आणि सत्याग्रहाचं अहिंसक शस्त्र हाती घेतलं. क्रांतिकार्यात असताना मृत्यूच्या हातात हात घेऊन चालतोय याची त्यांना जाणीव झाल्यावर त्यांनी बायकोला पत्र लिहून कळवलं, ‘आपल्या मित्राशी लग्न करून नीट प्रपंच कर. उगाच होरपळून घेऊ नकोस.’ यांचं शरीर आपल्यासारखंच हाडामांसाचं होतं. पण मन लोखंडाचं होतं. लोखंडाचे चणे ते, आपण साधे चणे खातो, त्या सहजतेने खायचे.

मुळशीच्या सत्याग्रहानंतर त्यांनी बॉम्ब सोडला. चरखा हातात घेतला. ते गांधीवादी झाले. हे स्वार्थासाठी टोपी फिरवणं नव्हतं. हा वैचारिक बदल होता. सावरकर काय, गांधी काय, सेनापती बापट काय, स्वर्गातून पृथ्वीवर येताना बॅगेत फक्त त्याग नावाची वस्तू घेऊन आले. स्वार्थ त्यांनी वरच स्वर्गात ठेवला होता. एकदा पु. ल. देशपांडे सेनापतींना एका कार्यक्रमासाठी घेऊन जाताना सेनापती एका पुलाच्या पायऱ्या मोजत वर चढले. पुलंनी त्यांना विचारले, ‘तात्या, पायऱ्या मोजताय?’ तात्या मिस्कीलपणे म्हणाले, ‘पूर्वी मला रशियन भाषा येत होती. फ्रेंच येत होती. पुढे त्यांचा वापर नसल्यामुळे विसरलो. माझ्या खिशात मोजायला काहीही नसतं. त्यामुळे आकडे विसरू नयेत म्हणून पायऱ्या मोजतो.’

जिथे अन्याय दिसला तिथे सेनापती बापटांनी लढा दिला. त्यांनी पक्ष पाहिला नाही. ज्या नेत्याचे विचार ज्या क्षणी पटले, त्याचं नेतृत्व स्वीकारलं. सावरकरांच्या हिंदू महासभेने निजामा विरुद्ध भागानगरचा सत्याग्रह पुकारला. तात्या बापटांनी त्यात पुढाकार घेतला. अंमळनेरला गिरणीची टाळेबंदी उठण्यासाठी सानेगुरुजींनी प्राणत्याग करायचं ठरवलं, त्यावेळी अनेक नेते तिथे सानेगुरुजींचं मन वळवायला गेले. बापटांनी सानेगुरुजींना कळवलं, तुम्ही एकट्याने प्राणत्याग करू नका. मी तुमच्याबरोबर प्राण त्यागायला येतो. ती बंदी उठली आणि दोघांचे प्राण वाचले. पुन्हा ४२च्या चले जावच्या वेळी समाजवाद्यांच्या एका मेळाव्यात ते वाघासारखे गुरगुरत फिरत होते आणि म्हणत होते, ‘मला कुणीतरी बॉम्ब आणून द्या. मला निकराची लढाई लढू द्या.’

ते गांधीवादी झाले तरी सावरकरांबरोबरची मैत्री अभेद्य होती. सावरकरांकडे फार थोडी माणसं अपॉइंटमेंटशिवाय येऊ शकत. त्यांत एम.एन.रॉय आणि सेनापती बापट होते. वर मी म्हटलंच आहे की, निजामा विरुद्ध सावरकरांनी भागानगर सत्याग्रह केला. सेनापतींना तो पटला. ते गांधीवादी, तरी सावरकरांच्या बाजूने सत्याग्रहात उतरले. त्यांना शिक्षा झाली. शिक्षा घेऊन येताना त्यांना वाटेत आप्पा कासार म्हणजे सावरकरांच्या शरीररक्षकाने वाकून नमस्कार केला.
सेनापतींनी त्याला काय आशीर्वाद दिला असेल?
ते म्हणाले, ‘जा. मोठ्यातली मोठी शिक्षा घेऊन ये.’
त्यावेळचे आशीर्वाद पण काय असायचे!
पुढे गांधीजींची हत्या झाली. विचार करा, गांधींवर प्रेम करणाऱ्या सेनापतींना काय वाटलं असेल? पण नंतर काही दिवसांनी नथुराम गोडसेला केस लढवून, त्याचे विचार मांडण्यासाठी एका वर्तमानपत्रात ‘गोडसे मदतनिधी’ जमवण्यात आला. त्यात पाच रुपयांची देणगी सेनापती बापटांची आहे.
बसतो विश्वास?
‘नथुरामने केलेलं कृत्य निंदनीय आहे. पण त्याचं मत मांडायचा त्याला अधिकार आहे.’ ही त्यांची भूमिका होती.
याला म्हणतात मत स्वातंत्र्यावरचं प्रेम! आणि कट्टर लोकशाहीवादी असणं.

आजच्या काळात सेनापतींवर काय काय आरोप झाले असते विचार करा. पण त्यावेळी लोकांना साधं लाकूड कुठलं आणि चंदन कुठलं ते कळायचं. जवाहरलाल नेहरू त्यांच्या प्रेमाचा माणूस, पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते नेहरूं विरुद्ध लढले. बेळगाव-कारवार प्रश्नात आघाडीवर राहिले. एकदा एका चळवळीत त्यांना कल्याणच्या पुढे यायला बंदी होती. ते खेडुताच्या वेशात थेट स्टेजवर आले. चळवळ दिसली की हा सेनापती त्यात उडी मारायचा.

पुढे वय होत गेलं. मग देशसेवा कशी करायची? त्यांनी झाडू हातात घेतला. स्वतःची गल्ली ते साफ करायचे आणि आपली माणसं, ते झाडू मारायला येणार म्हणून आपल्या लहान मुलांना आधीच हगवून, मुतवून ठेवत. म्हणजे मग स्वतःला साफ करायला नको.

तात्याराव सावरकर त्यांना म्हणत, ‘‘तू मला गुरू मानतोस ना, मग आता विश्रांती घे.’’

तेवढीच गोष्ट त्यांनी सावरकरांची ऐकली नाही. 88 वर्षांचे होईपर्यंत लढले.
कधी बॉम्ब, कधी चरखा, कधी लेखणी, कधी पिस्तूल, कधी झाडू घेऊन!
सतत मृत्यूला आव्हान देत.
ज्या मृत्यूला आपण इतके घाबरतो, त्या मृत्यूला ते सतत बरोबर घेऊन वावरले. तोच सेनापती बापटांना घाबरला.

पिस्तूल ते झाडू हा विलक्षण प्रवास करणाऱ्या या महामानवाला निदान दादरकरांनी तरी विसरू नये. तो कृतघ्नपणा होईल. त्यांना कुणी ‘एक म्हातारा’ म्हणणं निर्लज्जपणा. माझ्या भावना पोचतायत ना तुमच्यापर्यंत?

द्वारकानाथ संझगिरी.